तुतिकोरीन: तामिळनाडूमध्ये स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 13 जणांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्टरलाईट कॉपर प्लांटमधून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात स्थानिक रस्त्यावर आले. त्यामुळे तुतिकोरीनमध्ये मोठा हिंसाचार होऊन स्थिती हाताबाहेर गेली. मात्र तुतिकोरीनसारखाच भडका महाराष्ट्रातही उडाला असता. कारण हा प्रकल्प आधी कोकणात येणार होता. मात्र वेळीच विरोध केल्यानं हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. स्टरलाईट कॉपर प्लांटमधून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात सध्या स्थानिक जनता रस्त्यावर उतरली आहे. मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी 4 जणांनी जीव गमावल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 13 वर पोहोचला. सध्या तुतिकोरीनमध्ये दिसत असलेली परिस्थिती कोकणातही दिसली असती. मात्र पर्यावरणाला धोका असल्यानं या प्रकल्पाला विरोध झाला. त्यामुळे निसर्गाचं नुकसान टळलं. तुतिकोरीनमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे वादात सापडलेला स्टरलाईटचा प्रकल्प याआधीही चर्चेत राहिला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रासह गुजरात आणि गोव्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. मात्र या तिन्ही राज्यांमधून या प्रकल्पाला विरोध झाल्यानं हा प्रकल्प तामिळनाडूला नेण्यात आला. तामिळनाडूमध्ये हा प्रकल्प आणताना त्याच्याशी संबंधित माहितीशी छेडछाड करण्यात आली, असल्याचा आरोपदेखील काही स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. प्रकल्पाचा आजूबाजूच्या परिसरावर होणारा परिणाम, याबद्दल कंपनीनं दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा गंभीर आरोप स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आला आहे.
...तर तुतिकोरीनसारखा भडका महाराष्ट्रातही उडू शकला असता!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 2:18 PM