सत्य दडवले जाऊ शकत नाही, गुजरात विकास मॉडेलचा पोकळपणा उघड - राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:19 PM2017-09-04T23:19:35+5:302017-09-04T23:20:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने गाजावाजा केलेल्या गुजरात विकास मॉडेलची कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. गुजरात मॉडेल अयशस्वी ठरल्याने भाजपमध्ये घबराट पसरली आहे, असे ते म्हणाले.
अहमदाबाद, दि. 4 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने गाजावाजा केलेल्या गुजरात विकास मॉडेलची कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. गुजरात मॉडेल अयशस्वी ठरल्याने भाजपमध्ये घबराट पसरली आहे, असे ते म्हणाले.
गुजरातमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. मोदींच्या राज्यात होणाऱ्या या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याची जय्यत तयारी कॉंग्रेसने चालवली आहे. त्याच उद्देशातून राहुल यांनी येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दीर्घकाळ सत्य दडवले जाऊ शकत नाही. गुजरात विकास मॉडेलचा पोकळपणा उघड झाला आहे. त्यामुळे मोदी आणि भाजप गुजरात निवडणुकीच्या निकालाबाबत चिंतित बनले आहेत. यावेळी गुजरातमध्ये सरकार स्थापण्यापासून कॉंग्रेसला कुणीच रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस दोन दशकांपासून अधिक काळ गुजरातच्या सत्तेपासून दूर आहे.
युवक, शेतकरी, छोटे व्यावसायिक किंवा दुकानदार अशा कुठल्याच घटकाला गुजरात मॉडेलचा उपयोग झाला नाही. त्याचा लाभ केवळ 5 ते 10 व्यक्तींना झाला असा दावा करत राहुल यांनी कुणाचा नामोल्लेख टाळला. मोदी सरकार प्रसारमाध्यमांवर दबाव टाकत आहे, असा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्या, नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आगामी निवडणुकीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांना उपस्थित करता येऊ शकतील, अशी सूचनाही त्यांनी केली.
पक्षात राहून पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या गद्दारांना कोणत्याही परिस्थितीत माफी देण्यात येणार नसल्याचा इशारा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. केवळ भारतीय जनता पक्ष आणि त्याची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात ठामपणे काम करणाऱ्या व्यक्तींनाच गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल; असेही राहुल यांनी सुनावले आहे.