श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील रणनितीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये 70 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सुरक्षा दलांनी आता 'त्यांना जिवंत पकडा,' अशी घोषणा दिली आहे. दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना पकडून त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे पाठवण्यासाठी सुरक्षा दलांनी रणनितीत मोठा बदल केला आहे. याआधी दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना संपवण्यासाठी सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन ऑल आऊट' राबवलं होतं. दहशतवाद्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं रणनितीत बदल करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 'अनेक तरुणांना जिहाद करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. हे तरुण दहशतवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या ब्रेन वॉशिंगचे बळी ठरतात. त्यांना जिवंत पकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल,' अशी माहिती दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका अधिकाऱ्यानं दिली. पंधरा-सोळा वर्षांच्या तरुणांचं ब्रेनवॉशिंग केलं जातं. याची तीव्रता इतकी जास्त असते की, हे तरुण मरायला तयार होतात. या सगळ्या गोष्टींची कारणमिमांसा होणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. 'गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांच्या अनेक टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात आला आहे. हेच कमांडर्स लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांच्यासारख्या संघटनांमध्ये तरुणांची भरती करत होते. तरुणांना दहशतवादी मार्गाकडे नेण्यात कमांडर्सची भूमिका महत्त्वाची होती. त्यांचा खात्मा करण्यात आल्यामुळे आता सुरक्षा दलांनी पवित्रा बदलला', अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली.
'त्यांना जिवंत पकडा'; काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची नवी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 6:56 PM