नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) घोटाळ्याचा तपास जवळपास चार वर्षांनंतर हाती घेताना सीबीआयने मायावतींना जबाबासाठी पाचारण करण्याचे ठरविले आहे. त्यावर हा राजकीय सुडाचा प्रकार असून रालोआ सरकारने सीबीआयचा गैरवापर चालविल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. दरम्यान, सरकारने मायावती यांचा आरोप फेटाळून लावताना सीबीआय पुराव्यांच्या आधारावर कारवाई करत असल्याचे स्पष्ट केले.या घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही. सीबीआय ही तपास संस्था तपास करण्यास मोकळी आहे. खटल्यांना मी घाबरणार नाही, असेही मायावती म्हणाल्या. चार वर्षे उलटल्यानंतर सीबीआयने तपास करण्याचे कारण काय, हीच वेळ का निवडली असा सवालही त्यांनी केला. हा माझ्या पक्षाचे नैतिक धैर्य खच्ची करण्याचा तसेच जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेल्या अपयशापासून देशाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. भाजपने सीबीआयचा गैरवापर चालविला आहे. या पक्षाने अशा प्रकारचे तंत्र सोडून द्यावे, अन्यथा महाग पडेल, असा इशाराही त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना दिला. (वृत्तसंस्था)
राजकीय सूड उगविण्याचा प्रयत्न - मायावती
By admin | Published: September 23, 2015 12:54 AM