बंगळुरू : काही लोक आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. नव्या पिढीतील कलाकारांत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप प्रख्यात अभिनेते प्रकाश राज यांनी केला. येथे आयोजित करण्यात आलेल्या २२व्या आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपट महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘पद्मावती’ चित्रपटातील कलाकारांना मिळत असलेल्या धमक्या आणि नुकत्याच झालेल्या हत्येबद्दल त्यांनी राजस्थान सरकारवर टीका केली.
प्रकाश राज म्हणाले की, मी राजकारणी नाही. एक कलाकार म्हणून मी बोलत आहे, आवाज उठवित आहे. बोलणे ही आपली जबाबदारी आहे, असे मला वाटते. चित्रपट कलाकार हे आपल्या गुणवत्तेमुळे मोठे झालेले नाहीत. समाजाकडून मिळालेल्या प्रेमामुळे आपण आहोत. समाजाचे ऋण फेडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. समाजाचा आवाज बनून आपण ही जबाबदारी पार पाडली पाहिजे.प्रकाश राज यांनी सांगितले की, जेव्हा कलाकार, सृजक आणि निर्मितीक्षम लोक भित्रे बनतात, तेव्हा आपण संपूर्ण समाजच भित्रा होतो, हे समजून घ्यायला हवे. राजस्थानात कोणाची हत्या होत असेल, कलाकारांना नाक कापण्याच्या शीर कापण्याच्या धमक्या मिळत असतील, तर समाजात काय पद्धतीने दहशत निर्माण केली जात आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
धमक्या देणा-यांवर मी हसतोप्रकाश राज यांनी सांगितले की, काही गटांचे लोक मला धमकावत आहेत. मात्र, मी त्यांच्यावर हसतो. ते मला गप्प बसविण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मी गाणे गातो. मला कोणत्याही राजकीय पक्षाच्या समर्थनाची गरज नाही, कारण मी लोकांत उभा आहे. तुम्ही माझ्याबाबतीत जे काही कराल, तेव्हा लोक पाहतीलच. माझ्यावर आघात कराल, तर ते लोकांना कळेलच.