छपरा (बिहार) : म्हैस चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना जमावाने ठेचून मारल्याची घटना शुक्रवारी सारन जिल्ह्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांनी आरोप फेटाळले आहेत. राजू नट, बिदेश नट व नौशाद कुरेशी, अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बनियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे घडलेल्या या घटनेत या तिघांनी एक म्हैस चोरण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप केला जात आहे. जमावाच्या मारहाणीत तिघांपैकी दोन जण जागीच मरण पावले, तर तिसरा रुग्णालयात नेताना गतप्राण झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर किशोर राय यांनी दिली. या प्रकरणात तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.रुग्णालयात तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेत असताना त्यांचे कुटुंबीय आक्रमक झाले होते. त्यामुळे त्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला व स्थिती नियंत्रणात आणली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, भाकपाचे सरचिटणीस सत्यनारायण सिंग म्हणाले, बिहारमध्ये नितीशकुमार यांचे, तसेच केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार असताना जमावाकडून हत्या होण्याची ही आणखी एक घटना घडली आहे, या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करावी. (वृत्तसंस्था)>बंदोबस्त वाढविलाया घटनेनंतर मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंबीय व उर्वरित गावकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष उफाळून आला. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक अजयकुमार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आपण समजतो तशा प्रकारची ही घटना नाही. म्हैस चोरीवरून ही घटना घडली आहे.हल्लेखोर आणि ठार झालेले एकाच समुदायाचे आहेत. हल्लेखोरांना शोधले जाईल व कायदा हातात घेतल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला जाईल, असे अजयकुमार यांनी सांगितले. गावातील स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही बाजंूचे लोक गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यात दाखल झाले.
म्हैस चोरण्याचा प्रयत्न; तिघांना ठेचून मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 4:24 AM