गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांनी मोठं विधान केलं आहे. या विधानसभा निवडणुकीत अनेक आमदारांची तिकिटं कापली जातील. मात्र काँग्रेस ७५ जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच खास अंगठी घातल्यावर मला उपमुख्यमंत्रिपद मिळालं, आता पुढे आणखी काही चांगलं होईल, असा अजब दावाही त्यांनी केला.
भोपाळमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंहदेव आपल्या मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाले की, सध्या भूपेश बघेल हेच निवडणुकीचं नेतृत्व करणार आहेत. जर पक्षाचा विजय झाला तर तेच मुख्यमंत्री होतील. मात्र संघटनेमध्ये कुठलीही शक्यता कायम राहते. सन २०१८ मध्ये ज्या घोषणा केल्या होत्या, त्यामधील काही अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यात दारुबंदीचाही समावेश आहे.
यावेळी हातातील अंगठीबाबत विचारले असता सिंहदेव म्हणाले की, ही खास अंगठी परिधान केल्यावरच मला उपमुख्यमंत्रिपद मिळालं. आता यापुढेही माझ्यासोबत काही चांगलं होऊ शकतं, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. छत्तीसगडमधील निवडणुकीबाबत सिंहदेव म्हणाले की, काही लोक त्यांच्या पक्षासाठी ७५ पेक्षा अधिक जागांचा अंदाज वर्तवत आहेत. मात्र माझा अंदाज हा ६० ते ७५ जागांच्या आसपास आहे. २०१८ मध्ये काँग्रेसने ६८ जागा जिंकल्या होत्या. उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री बघेल यांच्याबरोबरची कटुता संपली आहे का, असं विचारलं असता, सिंहदेव यांनी प्रत्यक्षात अशी कटुता किंवा वैर नव्हते. आम्ही एकत्र काम करत आहोत. प्रश्न मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेण्याचा होता. त्याचा आमच्यासह आमच्यासोबत असलेल्यांवरही प्रभाव पडत होता.