डेहराडून : उत्तराखंडमध्ये मोदी लाट त्सुनामी बनून आली आणि आधीच दुर्बल झालेला काँग्रेसचा वृक्ष एका झटक्यात उन्मळून जमीनदोस्त झाला. राजकीय विश्लेषकांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाच भव्य रॅलींनी राज्यातील निवडणूक संग्रामाचा नूरच बदलून टाकला, ज्यात भाजपाने ६९ पैकी ५६ जागा जिंकून नवा विक्रम स्थापित केला. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेसने शानदार विजय संपादन केला असतानाच, मुख्यमंत्री हरीश रावत हे उत्तराखंडमध्ये असा करिश्मा दाखविण्यात अपयशी ठरले.दोन वर्षांपूर्वी रावत मुख्यमंत्री बनल्यानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती आणि त्यानंतर अनेक दिग्गज नेते काँग्रेसबाहेर पडले होते. काँग्रेसने या दारुण पराभवासाठी त्या बंडखोरीला जबाबदार धरले आहे. अनेक दिग्गज नेते काँग्रेसमधून बाहेर पडल्याने एकीकडे पक्ष कमजोर बनला आणि हे नेते भाजपात सामील झाल्याने या पक्षाचे बळ वाढले. काँग्रेस सोडून भाजपात सामील झालेल्या सर्व १२ दिग्गज नेत्यांना भाजपाने तिकीट दिले, ज्यापैकी १० नेते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्या बदल्यात त्यांचे पुत्र सौरभ बहुगुणा यांना भाजपाने उमेदवारी दिली. सौरभ हे सितारागंजमधून २८,४५० मतांनी विजयी झाले.निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आलेले माजी मंत्री यशपाल आर्य यांनीही पुत्र संजीव यांना नैनितालमधून रिंगणात उतरविले आणि त्यांचाही ७,२४७ मतांनी विजय झाला. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष किशोर उपाध्याय यांना काँग्रेसमधील बंडखोरीचा जबर फटका बसला. सहारनपूर येथे त्यांना १८,८६३ मतांनी पराभव चाखावा लागला. निवडणुकीतील या पराभवाची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री रावत यांनी स्वीकारली आहे. ‘माझ्या नेतृत्वातच काही उणिवा राहून गेल्या असतील, ज्यामुळे काँग्रेसची कामगिरी एवढी खराब राहिली,’असे सांगून रावत यांनी पराभवामागच्या इतर कारणांकडे दुर्लक्ष केले. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या. खुद्द मुख्यमंत्री रावत हे हरिद्वार ग्रामीण व किच्छा या दोन्ही मतदारसंघात पराभूत झाले.२०१२ मध्ये विजय बहुगुणा हे मुख्यमंत्री बनल्यापासूनच काँग्रेसमध्ये बंडखोरीची सुरुवात झाली होती. त्यावेळी डॉ. मनमोहनसिंग सरकारमध्ये श्रम राज्यमंत्री असलेले हरीश रावत यांनी बंडखोरी करीत पक्षाचा राजीनामा देण्याचीही धमकी दिली होती. त्यावेळी काँग्रेसश्रेष्ठींनी रावत यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांना शांत करण्यासाठी कॅबिनेट मंत्रिपदी बढती देत त्यांच्याकडे जलस्रोत विकास मंत्रालयाचा कारभार सोपविला.कॅबिनेट मंत्री बनताच रावत यांनी पुन्हा एकदा बहुगुणा यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला आणि २०१४ मध्ये त्यांना सत्तेवरून हटवून स्वत: मुख्यमंत्री बनले. रावत मुख्यमंत्री बनताच १ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांचे विरोधक व काँग्रेस नेते सतपाल महाराज यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपाचे कमळ हातात धरले. त्यानंतरही काँग्रेसमध्ये असंतोष खदखदत राहिला, पण रावत यांनी त्याची पर्वा केली नाही. गेल्या वर्षी मार्चमध्ये या असंतोषाचा भडका उडाला आणि १० वरिष्ठ आमदार काँग्रेस सोडून भाजपात सामील झाले. त्यानंतर लगेच दिग्गज नेते यशपाल आर्य हेही काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात आले. हे दिग्गज नेते सोडून गेल्याने काँग्रेस दुबळी झाली. हे नेते सोडून गेल्याने पक्ष दुबळा झाला आणि त्याचा परिणाम निवडणुकीत भोगावा लागला, अशी कबुली प्रदेशाध्यक्ष उपाध्याय यांनी दिली आहे.(प्रतिनिधी)
त्सुनामी बनून आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसचा दुबळा वृक्ष जमीनदोस्त
By admin | Published: March 13, 2017 12:52 AM