नवी दिल्ली: भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवणारे पैलवान कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन करत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून विनेश फोगाट, बरजंग पुनियासह अनेक पैलवान भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सध्या दिल्लीतील जंतर-मंतरवर पैलवानांचे धरणे आंदोलन सुरू आहे.
महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर शारीरिक शोषणासारखा गंभीर आरोप केला आहे. या मुद्द्यावर क्रीडा मंत्रालयासोबत बैठकही झाली, मात्र या चर्चेने कुस्तीपटू समाधानी नसून ब्रिजभूषण यांच्या हकालपट्टीची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे, ब्रिजभूषण शरणसिंहही बॅकफूटवर जायला तयार नाहीत. त्यांनी या आरोपांचे खंडन केले असून, राजीनामा देण्यासही स्पष्टपणे नकार दिला आहे.
मी तोंड उघडले तर...ब्रिजभूषण सिंह यांना त्यांच्या पदावरुन हटवले जाऊ शकते, असे वृत्त आहे. याबाबत माध्यमाशी बोलताना ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, 'मी आता तोंड उघडले तर त्सुनामी येईल. केवळ 3 टक्के कुस्तीपटू मला विरोध करत आहेत. माझ्यावरील शारीरिक शोषणाचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. आरोप खरे ठरले तर मी फाशी देईन, असेही ते म्हणाले होते.
दीपेंद्र हुड्डांवर आरोपमाझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले जात असून, हे सर्व काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांच्या सांगण्यावरून होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, जे पैलवान आरोप करत आहेत, त्यांची कारकीर्द संपलेली आहे, असेही ते म्हणाले. याशिवाय, आंदोलन करणारे बहुतेक कुस्तीपटू एकाच समाजातील आहेत. पक्षाकडून मला जो काही आदेश येईल, तो मी पाळेन, असेही ते म्हणाले.