पाटणा सुपरफास्ट ट्रेनमध्ये एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडली आहे. या ट्रेनमध्ये प्रवासी तिकीट परीक्षकाला (TTE) एका प्रवाशाने ट्रेनमधून धक्का दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात केरळ रेल्वे पोलिसांनी मंगळवारी माहिती दिली. ईके विनोद असे संबंधित टीटीईचे नाव आहे. त्यांनी प्रवाशाला तिकीटासंदर्भात विचारणा केली असता, संतापलेल्या प्रवाशाने त्यांना ट्रेनमधून धक्का दिला, असे पोलिसांनी म्हटले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना केरळच्या वेलप्पायामधील मुलंगुन्नाथुकावू आणि वडक्कनचेरी रेल्वे स्थानकादरम्यान सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी ओडिशातील दिव्यांग प्रवासी असून रजनीकांत असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी, टीटीईने रजनिकांतला पुढील स्थानकावर उतरण्यास सांगितले. तेव्हा आरोपी रजनिकांतने टीटीईला चालत्या रेल्वेतून बाहेर धक्का दिला. यानंतर, केरळ पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.