Haryana Assembly Election 2024: हरियाणात ५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान, काँग्रेसने हरियाणात सत्ता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. अशातच हरियाणा काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वीच भूपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांचा समावेश असलेल्या काही बड्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
काँग्रेस पक्षाच्या नेत्या कुमारी शैलजा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठा दावा केला आहे. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असं म्हणत एक दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असा सवाल कुमारी शैलजा यांनी मंगळवारी केला. दरम्यान, कुमारी शैलजा यांना विचारण्यात आले की, मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा होणार की दीपेंद्र हुड्डा. यावर, हा निर्णय इतर कोणीही नाही. पक्षाचे हायकमांड घेईल. दलित मुख्यमंत्री का होऊ शकत नाही? मला मुख्यमंत्री व्हायचे असेल तर अडचण काय आहे? असे कुमारी शैलजा म्हणाल्या.
प्रत्येक पक्षात भांडणे आहेत. मात्र तिकीट वाटप झाल्यानंतर प्रत्येकजण पक्षाला विजयी करण्यास सुरुवात करतो, असेही कुमारी शैलजा यांनी सांगितले. दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. ३२ उमेदवारांच्या यादीत कुमारी शैलजा यांच्या ४ समर्थकांना तिकीट देण्यात आले. पक्ष हायकमांडच्या या निर्णयानंतर कुमारी सैलजा यांचे मनोबल उंचावलेले दिसते. कुमारी शैलजा यांच्या चार समर्थकांमध्ये कालका येथून प्रदीप चौधरी, नारायणगडमधून शैली चौधरी, असंधमधून शमशेर सिंग गोगी आणि सधौरामधून रेणू बाला यांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यात काँग्रेसकडून भूपेंद्र सिंग हुडा, दीपेंद्र हुडा, रणदीप सुरजेवाला आणि कुमारी शैलजा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून हरियाणा काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे. राज्यातील पक्षीय राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भूपेंद्र सिंग हुड्डा, कुमारी शैलजा आणि रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.