13 दिवस बोगद्यात अडकलेत मजूर; स्ट्रेस दूर करण्यासाठी NDRF ची शक्कल, पाठवला लुडो गेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:29 IST2023-11-24T13:28:19+5:302023-11-24T13:29:37+5:30
बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचा आजचा 13 वा दिवस आहे. ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे. इतके दिवस बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मनावर प्रचंड स्ट्रेस आहे.

13 दिवस बोगद्यात अडकलेत मजूर; स्ट्रेस दूर करण्यासाठी NDRF ची शक्कल, पाठवला लुडो गेम
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचा आजचा 13 वा दिवस आहे. ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे. इतके दिवस बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मनावर प्रचंड स्ट्रेस आहे.
बचाव कार्याच्या शेवटच्या टप्प्यात अशा परिस्थितीत मानसशास्त्रज्ञांच्या सूचनेवरून या मजुरांसाठी लुडो आणि पत्ते पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे, जेणेकरून मजूर आतमध्ये खेळून थोडे रिलॅक्स होऊ शकतील. त्यांना मानसिक बळ मिळेल. आज बचाव कार्याचा शेवटचा दिवस असू शकतो असं म्हटलं जात आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशनमध्ये अनेक अडथळे येत आहेत. गुरुवारी (२३ नोव्हेंबर) रात्री उशिरा बोगद्याच्या ढिगाऱ्यात पाईप टाकण्याचे काम थांबवावे लागले कारण ड्रिलिंग मशिन ज्या प्लॅटफॉर्मवर आहे त्या प्लॅटफॉर्ममध्ये भेगा दिसल्याने ड्रिलिंग थांबवण्यात आले होते.
बचावस्थळी उपस्थित मनोचिकित्सक डॉ. रोहित गोंदवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार,"आत अडकलेले सर्व 41 मजूर निरोगी आहेत, परंतु त्यांना मानसिकदृष्ट्याही निरोगी ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच अडकलेल्या मजुरांना त्यांच्या स्ट्रेसमधून मुक्त होण्यासाठी आम्ही लुडो, बुद्धिबळ आणि पत्ते देण्याचा विचार करत आहोत."