नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले होते. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे. भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या एक परदेशी तरुणीने थेट आंध्र प्रदेशमध्ये येऊन त्याच्याशी पारंपरिक पद्धतीनं विवाह केला आहे. यासाठी तिने हजारो किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. दोघांचा आधीच साखरपुडा झाला होता. मात्र एकमेकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या या जोडप्याला घरच्यांची परवानगी मिळवण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागली. त्यानंतर आता त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा आंध्रप्रदेशमधील गुंटूरचा असणारा मधू संकिरथ हा काही कामानिमित्त तुर्कीमध्ये राहत होता. 2016 मध्ये तुर्कीतील गिजेम नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली. दोघंही एकाच संस्थेत आणि एकाच विभागात काम करत होते. मधूचा मदत करण्याचा आणि खेळकर स्वभावामुळे त्याची गिजेमशी मैत्री झाली आणि काही दिवसांतच या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही या प्रेमाचं रुपांतर लग्नात करावं, असा निर्णय घेतला आणि त्यासाठी आपले विचार घरच्यांना सांगितले.
2019 मध्ये झाला दोघांचा साखरपुडा
लग्नाच्या निर्णयाबाबत समजताच दोन्ही कुटुंबीयांनी याला कडाडून विरोध केला. त्यांना हे लग्न मान्य नव्हतं. मधू आणि गिजेम यांनी घरच्यांची समजूत काढली. त्यांना आपण एकमेकांसाठी योग्य जोडीदार असल्याचं पटवून दिलं. त्यानंतर कुटुंबीयांनी देखील परवानगी दिली. 2019 मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला आणि 2020 मध्ये त्यांना लग्न करायचं होतं. मात्र नेमका त्याच काळात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोघंही आपापल्या देशांत अडकून पडले.
दाक्षिणात्य पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पडला पार
जुलैमध्ये विमानसेवा सुरू झाल्यानंतर मधू तुर्कीला गेला आणि तिथं दोघांनी तिथल्या पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर दोघंही भारतात आले आणि दाक्षिणात्य पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. पारंपरिक तेलुगु पद्धतीने झालेल्या या लग्न सोहळ्यासाठी जवळचे निमंत्रित उपस्थित होते. सर्वांनी परदेशी वधू आणि देशी वराला भरभरून आशीर्वाद दिले. Map Data नुसार, तुर्की ते गुंटूर हे अंतर 5 हजार किलोमीटरहून अधिक आहे. त्यामुळे लग्नासाठी वधूने केलेल्या या प्रवासाची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.