हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 09:44 PM2024-11-27T21:44:18+5:302024-11-27T21:45:02+5:30
विरोधकांच्या गोंधळानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
नवी दिल्ली: अदानी समूहाशी संबंधित वाद आणि उत्तर प्रदेशातील संभलमधील हिंसाचाराच्या मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेत गाजला. अदानी समूहाच्या कारभाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्याबरोबरच, संभाळ हिंसाचारावर चर्चेची मागणी विरोधी खासदारांनी केली. गदारोल वाढल्यानंतर सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी संसदेचे कामकाज संपूर्ण दिवसासाठी तहकूब केले.
लोकसभेचे कामकाज तहकूब
अदानी प्रकरणातील जेपीसी तपासावरुन सरकार आणि विरोधकांमधील दीर्घकाळ चाललेला राजकीय संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही बाजुचे खासदार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासातच अमेरिकेतील न्यायालयाशी संबंधित अदानी समूहाचा वाद स्थगन प्रस्तावाच्या नोटीसांद्वारे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु सभापती ओम बिर्ला यांनी ते टाळले. यानंतर विरोधी खासदारांनी त्याला कडाडून विरोध केल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेतही गदारोळ
राज्यसभेतही सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापती जगदीप धनखड आणि विरोधी खासदारांमध्ये बाचाबाची झाली. नियम 267 अन्वये अदानी मुद्द्यावर चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधी खासदारांच्या 18 वेगळ्या नोटिस धनखर यांनी फेटाळल्या. त्यापैकी नऊ अदानी प्रकरणावर तर उर्वरित संभाळ विषयावर देण्यात आल्या होत्या. मात्र, असे असतानाही काँग्रेस, तृणमूलसारखे विरोधी पक्ष अदानी समूहाचा मुद्दा उपस्थित करू लागले. यावर अध्यक्षांनी ते रेकॉर्डवर जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
हिंसाचारावरही चर्चेची मागणी
त्याचवेळी सपा आणि आम आदमी पार्टीसह काँग्रेसचे काही खासदार संभल हिंसाचारावर चर्चेची मागणी करत होते. सभागृह सुरळीत नाही, त्यामुळे हा मुद्दा मांडता येणार नाही, असे सांगत पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करून विरोधी खासदारांचा सभागृहात बोलण्याचा प्रयत्नही धनखर यांनी हाणून पाडला. यानंतर सभागृहाचे कामकाज आधी सकाळी 11.30 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.