लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : खादी ग्रामोद्योगची उलाढाल पहिल्यांदाच दीड लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे आणि खादी आणि हातमागाच्या वाढत्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले.
आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ११२ व्या भागात मोदी म्हणाले की, ज्यांनी पूर्वी कधीही खादी उत्पादने वापरली नाहीत, तेही आज मोठ्या अभिमानाने खादी वापरतात. देशवासीयांना खादीचे कपडे खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताच्या ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. गणित ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आसामच्या ‘मोइदाम्स’चा समावेश केल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.
‘भारत अमली पदार्थमुक्त करा’
अमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित काळजी व्यक्त केली. भारत अमली पदार्थमुक्त करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांना मदत करण्यासाठी ‘मानस’ची हेल्पलाइन आणि पोर्टल काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले असून सरकारने १९३३ हा टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे.
विक्रीत ४०० टक्के वाढ
खादीची विक्री ४०० टक्के वाढली आहे. देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत आणि स्त्रिया याच्याशी सर्वाधिक जोडलेल्या असल्याने त्यांचा सर्वाधिक फायदाही होत आहे. लाेकांनी या वर्षापासूनच खादीचे कपडे खरेदी करायला सुरुवात करावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
सर्वाधिक वाघ भारतात असल्याचा अभिमान
जगातील ७० टक्के वाघ भारतात असल्याचे अधोरेखित करून ते म्हणाले की याचा आम्हाला अभिमान आहे. हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर राष्ट्रध्वजासह सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन त्यांनी केले.