भाजपाआमदार ठाकूर दास यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये हे आमदार महोदय नाचताना दिसत आहे. प्रसंग आनंदाचा असल्याने नाचगाणं साहजिकच आहे. मात्र त्यालाच आता लोकांनी मुद्दा बनवलं आहे. ठाकूर दास हे नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया येथील भाजपा आमदार आहेत. त्यांचा डिजेवरील गाण्यावर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री कन्यादान योजनेतून पिपरिया येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या वरातीमध्ये ठाकूरदास नागवंश यांनी कार्यकर्त्यांसोबत डान्स केला. तेव्हा ‘तुझको ही दुल्हनिया बनाऊंगा, वरना कुंवारा मर जाऊंगा, हे गाणे वाजत होते. आता काँग्रेसने या गाण्यालाच मुद्दा बनवून वादाला तोंड फोडले आहे. आमदार महोदयांच्या नाचण्याला विरोध नाही तर त्यांनी ज्या गाण्यावर महिला नेत्यांचा हात धरून नाच केला, त्याला आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुष्पराज पटेल यांनी ठाकूरदास नागवंशी यांचा नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की हे योग्य नाही. महिला नेत्यांचा हात पकडून पिपरियाचे आमदार ‘तुझको ही दुल्हनिया बनाऊंगा, वरना कुंवारा मर जाऊंगा, असं म्हणत आहेत, हे योग्य नाही.
दरम्यान, ठाकूरदास नागवंशी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत गरिब कुटुंबातील ३२ जोडप्यांचा विवाह होत होता. त्यांची सामुहिक वरात निघाली होती. वरातीमध्ये आम्ही सारेजण एकत्र आनंदाने नाचत होतो. कुटुंबातील लग्नात सारे आनंदाने नाचतात, त्यात चुकीचं काय आहे, अशी विचारणा त्यांनी केली आहे.