ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी मुस्लिम तरुणांना तेलंगणा पोलीस उकसवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे केला होता. दिग्विजय सिंहांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. आता तेलंगणा पोलिसांनी दिग्विजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. असे आरोप करून पोलिसांची प्रतिमा मलिन आणि त्यांचे खच्चीकरण केले आहे, असे तेलंगणातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सिंह यांनी सोमवारी ट्विट करून तेलंगणा पोलीस मुस्लिम तरुणांना ‘कट्टरपंथी’ बनवण्यासाठी तसेच दहशतवादी संघटनांचे बोगस संकेतस्थळ तयार करून त्याद्वारे‘आयसिस’साठी काम करण्यास चिथावणी देत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
मुस्लिम तरुणांना जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांना आयसिसमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्याच्या पोलिसांना ‘आदेश’ दिले असल्यास त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, असेही सिंह म्हणाले होते. राव यांनी असं काही केलं नसल्यास या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली होती.या आरोपांमुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.