श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारे काँग्रेसचे ट्विट वादात, नेटिझन्सच्या संतापानंतर डिलीट केले ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 04:10 PM2018-02-25T16:10:43+5:302018-02-25T16:10:43+5:30
श्रीदेवींच्या निधनानंतर सोशल मीडियावर लहान मोठ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाकडूनही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र काँग्रेसचे श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारे ट्विट वादात सापडले.
नवी दिल्ली - श्रीदेवींची अकाली एक्झिट त्यांच्या असंख्य चाहत्यांना सदमा देऊन गेली. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर लहान मोठ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाकडूनही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र काँग्रेसचे श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारे ट्विट वादात सापडले. नेटिझन्सनी ट्विटमधील मजकुरावरून काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. अखेर काँग्रेसकडून हे ट्विट डिलीट करण्यात आले.
त्याचे झाले असे की, श्रीदेवींच्या निधनाची बातमी आल्यानंतर आज सकाळी काँग्रेसकडून ट्विटरवर ट्विट करून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहण्यात आली. "श्रीदेवींच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हाला दु:ख झाले आहे. त्या एक उत्कृष्ट कलाकार होत्या. त्या आपल्या सुखेर अभिनयामुळे आमच्या हृदयात कायम वास करतील. त्यांच्या चाहत्यांप्रति आम्ही सहवेदना प्रकट करतो. त्यांना 2013 साली यूपीए सरकारच्या कार्यकाळात पद्मश्री देण्यात आला होता." असे ट्विट काँग्रेसने केले.
मात्र या ट्विटमधील शेवटची ओळ वादाचे कारण बनली. अनेट नेटीझन्सनी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली. शेकडो जणांनी ट्विट करून मृत्युप्रसंगी राजकारण न करण्याचा सल्ला दिला. अखेर सोशल मीडियावरील वाढता वाद पाहून काँग्रेसने हे ट्विट डिलीट केले. त्यानंतर काँग्रेसने चूक सुधारत नवीन ट्विट करून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली.
- काँग्रेसचे वादात सापडलेले ट्विट