अहमदाबाद : जगप्रसिद्ध नेते नेल्सन मंडेला (Nelson Mandela) एकदा म्हणाले होते, "लोकांनी द्वेष करायला शिकले पाहिजे. जर ते द्वेष करायला शिकू शकले, तर त्यांना प्रेम करायला शिकवले जाऊ शकते, कारण प्रेम द्वेषापेक्षा मानवी हृदयात अधिक नैसर्गिकरित्या येते.,"
देशात सोशल मीडियावर द्वेष पसरवणारा बराच आशय वाईट प्रवृत्तीच्या लोकांकडून पसरवला जात असल्याचे दिसते. पण त्यातही असा काही आशय आपल्याला सोशल मीडियावर दिसतो की ज्यामुळे आपले उर भरून येते. भारतीय संस्कृती आणि भारतीयांच्या संस्कारांची जाणीव होते. झालं असं की, शुक्रवारी संध्याकाळी मुस्लीम बांधवांना रोजा सोडण्यासाठी हिंदू मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले होते. तिथं बसून या बांधवांनी रोजा सोडला. हा बंधुता आणि सौहार्दाचा प्रसंग गुजराजमधील बनासकांठा जिल्ह्यातील दलवाना खेड्यातील आहे. याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वडगाम तालुक्यात असणाऱ्या दलवाना गावातील 100 मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यातील मगरीब नमाज (Maghrib Namaz) अदा करण्यासाठी आणि रोजा सोडण्यासाठी सांयकाळी 7 च्या सुमारास निमंत्रित केले होते. तब्बल बाराशे वर्ष जुने असणाऱ्या या वरंडा वीर महाराज मंदिराच्या (Varanda Vir Maharaj Mandir) आवारात या मुस्लीम बांधवांना आमंत्रित करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांना रोजा सोडण्यासाठी मंदिराचा परिसर पहिल्यांदाच उघडण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी पंकज ठकार यांनी दिली.
"वरंडा वीर महाराज मंदिर हे गावातील एक ऐतिहासिक स्थळ आहे. वर्षभर अनेक पर्यटक या स्थळाला भेट देतात. बंधुतावर आमचा नेहमीच विश्वास आहे. अनेक वेळा हिंदू आणि मुस्लिम सणांच्या तारखा एकाच दिवशी येतात. त्यावेळीही आम्ही एकमेकांना मदत करतो. यावर्षी, मंदिर ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने मुस्लिम बांधवांना त्यांच्या उपवास सोडण्यासाठी आमच्या मंदिर परिसरात आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आम्ही पाच ते सहा प्रकारची फळे, खजूर आणि शरबत यांची व्यवस्था केली. तसेच मी गावातील स्थानिक मशिदीच्या मौलाना साहेबांचे वैयक्तिकरित्या स्वागत केले," असं ठकार म्हणाले
2011 च्या जनगणनेनुसार, दलवानाची लोकसंख्या अडीच हजार आहे. ज्यात प्रामुख्याने राजपूत, पटेल, प्रजापती, देवीपूजक आणि मुस्लिम समुदायांचा समावेश आहे. मुस्लिमांमध्ये साधारणतः शेती आणि व्यवसायात गुंतलेली सुमारे ५० कुटुंबे असतात.