अयोध्या - उत्तर प्रदेशमधीलअयोध्या येथे मोठी दुर्घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध गुप्तार घाटावर शरयू नदीमध्ये स्नान करत असताना एकाच कुटुंबातील १२ जण बुडाल्याच्या माहिती समोर येत आहे. दरम्यान, नदीत बुडालेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. मिळेलाल्या माहितीनुसार आग्रा येथील चार कुटुंबामधील १५ जण अयोध्येमध्ये दर्शनासाठी आले होते. मात्र गुप्तार घाटावर स्नान करत अशताना ते शरयू नदीत अचानक बुडाले. बुडालेल्या लोकांमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे. दरम्यान, दुर्घटनास्थळावरून लोकांनी तीन जणांना वाचवले. त्यानंतर बचावकार्य सुरू झाले. बचाव पथकाने दोन मुलींना वाचवण्यात यश मिळवले. आता उर्वरित १० जणांचा शोध सुरू आहे. बचाव मोहिमेचे नेतृत्व स्वत: एसएसपी शैलेश पांडे हे करत आहेत.(Twelve members of the same family drowned while bathing in saryu river in Ayodhya, one girl rescued)
गुप्तार घाटाच्या शेवटच्या टोकावर एक कुटुंब स्नान करत होते. मात्र त्याचवेळी त्यांचा तोल गेला आणि ते नदीत वाहून गेले. लोकांच्या बुडण्याची माहिती त्वरित पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि पाणबुडे घटनास्थळावर बचावकार्य करत आहेत. दरम्यान, दुर्घटनेची सूचना मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळावर दाखल होत आहेत. दुर्घटनेची शिकार झालेले कुटुंबा आग्रा येथील सिकंदरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दुर्घटनेची शिकार झालेल्या कुटुंबातील बचावलेल्या सतीश यांनी सांगितले की, चार कुटुंबे दोन गाड्यांमधून आग्रा येथून आली होती. या सर्वांनी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ते सर्वजण घाटावर बसले. पावसामुळे तेथील पायऱ्या निसरड्या झाल्या होत्या. त्याचदरम्यान कुटुंबातील सर्वजण एकेक करून वाहून गेले.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील गुप्तार घाटावर १२ जण बुडाल्याची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळावर पोहोचून बचावकार्य करण्याचे आदेश दिले.