नवी दिल्ली: 11 ऑगस्ट रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात मार्शलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले 12 खासदार आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातून या खासदारांना पूर्णपणे निलंबित करण्यात आले आहे.
110 दिवसांपूर्वी म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात घडलेल्या त्या घटनेमुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या संपूर्ण सत्रातूनच त्या खासदारांचे निलंबन झाले आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित खासदार आज(मंगळवार) राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करू शकतात.
निलंबनाबाबत आज विरोधकांची बैठक
विरोधी खासदारांवर झालेल्या या कारवाईविरोधात आज विरोधी पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होईल. दरम्यान, या कारवाईबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इतरांसाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबला जात असेल, तर ते लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे. आम्ही या कारवाईचा तीव्र निषेध करतो, असं ते म्हणाले. शिवाय, पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काँग्रेस 6; तृणमूल, शिवसेना आणि डाव्यांचे 6 खासदार
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सोमवारी निलंबित खासदारांची नावे जाहीर केली. यामध्ये काँग्रेसच्या 6 खासदारांचा समावेश आहे: फुलो देवी नेताम, छाया वर्मा, रिपुन बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासिर हुसेन, अखिलेश प्रसाद सिंग. डोला सेन आणि शांता छेत्री यांना ममता बॅनर्जी यांच्या TMC पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. त्याचवेळी सीपीएमचे एलराम करीम आणि सीपीआयचे बिनॉय विश्वम यांचाही निलंबित खासदारांच्या यादीत समावेश आहे.
पावसाळी अधिवेशनात काय घडलं होतं?11 ऑगस्टला विमा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्स बोलावण्याची वेळ आली. सभागृहात घडलेल्या घटनांमुळे लोकशाहीचं मंदिर अपवित्र झाल्याचं राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यावेळी म्हटलं होतं. या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील कामकाज स्थगित करण्यात आली. लोकसभेत केवळ 21 टक्के, तर राज्यसभेत केवळ 28 टक्के कामकाज झालं.