Twin Towers Demolition : नोएडाच्या सेक्टर 93-ए मध्ये बांधलेले सुपरटेक ट्विन टॉवर्स अखेर कोसळले आहेत. 13 वर्षांमध्ये बांधलेल्या या गगनचुंबी इमारती अगदी काही सेकंदात कोसळल्या. यासाठीची सर्व तयारी आधीच पूर्ण झाली होती, प्रशासनही हाय अलर्टवर होते. हे टॉवर कोसळताना घटनास्थळी एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथकही हजर होते.
सेक्टर-93-ए मध्ये बांधलेली 103 मीटर उंच एपेक्स आणि 97 मीटर उंच सियन टॉवर पाडण्यासाठी वेगवेगळ्या मजल्यांवर 3700 किलो स्फोटके लावण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव एमराल्ड कोर्ट आणि लगतच्या सोसायट्यांचे फ्लॅट रिकामे केले आहेत. याशिवाय सुमारे तीन हजार वाहने आणि 200 पाळीव प्राणीही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत. एडफिस इंजिनीअरिंगचे प्रकल्प व्यवस्थापक मयूर मेहता यांनी सांगितले की, पोलिसांकडून मंजुरी मिळाल्यानंतर 'ट्रिगर' दाबण्यात आला.
नोएडा प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रितू माहेश्वरी यांनी सांगितले की दोन्ही टॉवरमधून सुमारे 60 हजार टन मलबा बाहेर येईल. यातील सुमारे 35 हजार टन डेब्रिजची विल्हेवाट लावली जाणार आहे. स्वीपिंग मशिन, अँटी स्मॉग गन आणि वॉटर स्प्रिंकलर मशिनसह कर्मचारी तेथे हजर राहून विध्वंसानंतरचा मातीचा ढिगारा साफ करतील.