ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - अभिनेता आणि भाजपा खासदार परेश रावल यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं आहे. त्यांचं अकाऊंट पाहू शकतो, मात्र ते काही ट्विट करु शकत नाहीत. अरुंधती रॉय यांच्यासंबंधी ट्विट डिलीट केलं नाही तर त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल अशी सूचना त्यांना ट्विटरकडून देण्यात आली होती. परेश रावल यांनी नकार दिल्यानंतर ट्विटरने ते ट्विट डिलीट करत अकाऊंट ब्लॉक केलं आहे.
"ट्विट डिलीट करण्यासाठी आपल्याला धमकावलं जात होतं असा आरोप परेश रावल यांनी केला आहे. हे फक्त माझं एक ट्विटर अकाऊंट आहे, भारतीय पासपोर्ट नाही", असं परेश रावल बोलले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाईटने आपल्याला अकाऊंट ब्लॉक करण्याची धमकी दिली होती असा दावा परेश रावल यांनी केला आहे.
परेश रावल यांचं ते वादग्रस्त ट्विट सध्या त्याच्या अकाऊंटवर दिसत नाही आहे. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, "मी अद्यापही माझ्या ट्विटवर ठाम आहे. मी माझं ट्विट डिलीट केलेलं नाही. ट्विटरने ते डिलीट केलं आहे". काश्मीरमध्ये ज्या अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला, त्या अधिका-याने युवकाऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होते असे टि्वट परेश रावल यांनी केले होते.
"मला माहिती आहे की माझ्या ट्विटरविरोधात नक्कीच कोणीतरी तक्रार केली असेल. पण जेएनयूची विद्यार्थी शहला राशिदनेही वादग्रस्त ट्विट केलं होतं. जीपवर दगडफेक करणा-याच्या जागी गौतम गंभीरला बांधण्याबद्दल त्या बोलल्या होत्या. जीपवर बांधण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो एडिट करत त्याठिकाणी गौतम गंभीरचा चेहरा लावण्यात आला होता", असं परेश रावल बोलले आहेत.
"काँग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनीदेखील भाजपा- पीडीपी युतीवर ट्विट केलं होतं, पण ते डिलीट करण्यात आलं नव्हतं. मला ट्विट डिलीट करण्यास सांगण्यात आलं होतं. पण मी त्यासाठी नकार दिला. मी विचार करुन ते ट्विट केलं होतं. कोणत्याही रागात किंवा अन्य कोणत्याही कारणाने ते केलेलं नव्हतं", असं परेश रावल यांनी सांगितलं आहे.
परेश रावल यांच्या ट्विटला रिट्विट करत गायक अभिजित भट्टाचार्य यांनी एक पाऊल पुढे टाकत रॉय यांना केवळ जीपला बांधू नका तर गोळ्या घाला असं ट्विट केलं होतं. तसंच भट्टाचार्यने जेएनयूच्या शेहला रशिद हिच्याविरोधातही ट्विट केलं होतं. महिलाविरोधी ट्विट केल्यामुळे त्यांचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे. तर भट्टाचार्यला समर्थन म्हणून गायक सोनू निगमने स्वतःच ट्विटर अकाउंट बंद केलं आहे.