नवी दिल्ली : लडाखमधील लेह हे शहर चीनचा भाग असल्याचे ट्विटरच्या जिओ लोकेशनवर दिसत होते. त्याबद्दल ट्विटरने भारताची तोंडी माफी मागितली आहे. मात्र, त्यावर समाधान न मानता ट्विटर कंपनीने लेखी माफी मागावी व याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश संयुक्त संसदीय समितीने दिला आहे.
ट्विटरच्या जिओ लोकेशनवर करण्यात आगळिकीमुळे संयुक्त संसदीय समितीने या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना धारेवर धरले. माहिती (डाटा) संरक्षण विधेयकाचा फेरआढावा घेण्यासाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने ट्विटरच्या आगळिकीची गंभीर दखल घेतली. लेह हा चीनचा भाग दाखविणे या गुन्ह्याबद्दल ट्विटरच्या अधिकाऱ्यांना सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असेही या समितीने सुनावले होते.
युद्धात विलक्षण पराक्रम गाजविलेल्या शूर जवानांना मानवंदना देण्यासाठी लेह येथे एक स्मारक उभारण्यात आले आहे. त्या जागेवरून एक पत्रकार गेल्या आठवड्यात आपल्या कार्यक्रमाचे ट्विटरवरून थेट प्रक्षेपण करीत होता.