नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकांच्या परीक्षा रखडल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच दरम्यान ट्विटरवर सध्या Cancel10thICSEBoards हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
सोशल मीडियावर एखादी गोष्ट झटपट व्हायरल होते. नवनवीन ट्रेंड्स हे सातत्याने येत असतात. गेल्या काही दिवसांपासून #Cancel10thICSEBoards हा ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा 2 जुलै ते 14 जुलैदरम्यान घेण्याचा निर्णय आयसीएसई बोर्डाने घेतला. या निर्णयाला पालकांनी विरोध केला आहे. आयसीएसई बोर्ड परीक्षा रद्द करत नसल्याने पालकांनी ट्विटरवर #Cancel10thICSEBoards अंतर्गत परीक्षा रद्द करण्याबाबत एक मोहीम सुरू केली आहे. ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करत अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ट्विटरवर आतापर्यंत तब्बल 25,000 हून अधिक लोकांनी #Cancel10thICSEBoards वापरला आहे.
आयसीएसई बोर्डाने परीक्षा रद्द कराव्यात, विद्यार्थ्यांच्या आवाज देशभरात पोहोचावा म्हणून Cancel10thICSEBoards हे ऑनलाईन कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे. यासंदर्भात WhatsApp ग्रुप तयार करण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे जेणेकरून परीक्षा रद्द केल्या जातील. 'परीक्षेपेक्षा मुलं जास्त महत्त्वाची आहेत. कोरोनाच्या काळात परीक्षा रद्द करा' अशी एकच मागणी सर्वांनी केली आहे. 'दहावीची परीक्षा ही मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते मात्र यासाठी आम्ही आमच्या मुलांचा जीव पणाला लावू शकत नाही' असं अनेक पालकांनी म्हटलं आहे. तसेच परीक्षा आणि निकाल हे येतच असतात पण कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय करणार... तो परत येणार आहे का? असा संतप्त सवाल अनेकांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्यांसह अनेक पालकांनी परीक्षेबाबतचं आपलं मत मांडलं आहे. तसेच दिल्ली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, शिक्षणमंत्र्यांना, लोकप्रिय न्यूज चॅनेलला देखील टॅग केलं आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याच्या आयसीएसईच्या निर्णयाला एका वकिलाने मुंबई अरविंद तिवारी यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असून विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडली आहे.
पालकांनी याबाबत पंतप्रधान कार्यालय व एचआरडी मंत्रालयाकडे तक्रार केली. मात्र, आयसीएसई हे खासगी बोर्ड असल्याने आपण यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे याबाबत बोर्डाशीच चर्चा करावी, असे पंतप्रधान कार्यालयातून कळविण्यात आले. त्यामुळे न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरला नाही, असे तिवारी यांनी याचिकेत म्हटले आहे. मुंबईसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बोर्ड विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात यावी व लवकर निकाल लावावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यास विलंब होणार नाही, त्यासाठी या याचिकेवर तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.