लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू व काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने बजावलेल्या नोटीसचा निषेध करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘कायर’ असा उल्लेख केला. हे ट्वीट टि्वटरने काढून टाकले आहे. तसेच भाजपनेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी वापरलेल्या शब्दांवर आक्षेप घेतला आहे.
विमा घोटाळ्याप्रकरणी सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस बजावली आहे. या नोटीशीनंतर मलिक यांचे समर्थन करणारे ट्वीट मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले. ते म्हणाले, ‘संपूर्ण देश आपल्यासोबत आहे. भीतीच्या या काळात आपण खूप धाडस दाखविले आहे.’ यानंतर त्यांनी नावाचा थेट उल्लेख न करता ‘कायर’, ‘अनपढ’ अशा शब्दांचा उल्लेख केला होता.
याशिवाय ‘जेव्हा जेव्हा या महान देशावर संकट आले आहे. आपल्यासारख्या लोकांनी धाडसाने मुकाबला केला आहे. ते आपला सामना करू शकत नाहीत. तुमचा मला अभिमान आहे,’ असा मजकूर असलेले ट्वीट आता डीलीट केल्याचे ट्विटरने म्हटले आहे. भाजपनेही मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या या ट्वीटवर आक्षेप नोंदविला आहे. ही भाषा शिक्षित व्यक्तीची राहू शकत नाही, असेही भाजपने म्हटले आहे.