नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचा डीपी (प्रोफाइल फोटो) ट्विटरने गुरुवारी रात्री काही वेळासाठी हटवला होता. मात्र, नंतर तो पुन्हा दिसू लागला. सांगण्यात येते, की शाह यांचा डीपी असलेल्या फोटोवर कुणी कॉपीराईटचा दावा केला होता. यानंतर ट्विटरने ही कारवाई केली. यामुळे अनेक जण हैराण झाले होते. यानंतर ही घटना काही वेळातच सोशल मीडियावरही व्हायरल झाली.
अमित शाह यांच्या व्हेरिफाईड ट्विटर अकांउंटच्या डीपीवर क्लिक केल्यानंतर तेथे फोटो दिसत नव्हता. डिस्प्ले पिक्चर (प्रोफाइल फोटो)च्या ठिकाणी एक ब्लँक पेज दिसत होते. तसेच त्यावर एक मेसेजही लिहिलेला दिसत होता. यात कॉपीराईटअंतर्गत डीपी फोटो हटवल्याचे सांगण्यात आले होते.
त्यावर, 'कॉपीराईटच्या रिपोर्टमुळे फोटो हटवण्यात आला आहे,' असे लिहिलेले होते. मात्र, यानंतर पुन्हा डिस्प्ले पिक्चर दिसू लागला. मात्र, यासंदर्भात ट्विटरकडून अधिक माहिती देण्यात आलेली नाही. अमित शाह यांच्या ट्विटरवर 23 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
ट्विटरने नुकताच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात BCCIच्या आधिकृत ट्विटर हँडलवरूनही डीपी हटवला होता. तसेच यावेळीही कंपनीने कॉपीराईटचेच कारण सांगितले होते.