नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरला (Twitter) पत्र लिहून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या दबावाखाली माझा आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर माझ्या फॉलोअर्सची संख्या कमी केली जात आहे, असा आरोप राहुल यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता ट्विटरकडून स्पष्टीकरण आले आहे.
यावर ट्विटरने प्रतिक्रिया देताना म्हटले की, "फॉलोअर्सची संख्या हे व्हिजिबल फीचर आहे आहे. फॉलोअर्सची आकडेवारी अचूक आहे, यावर प्रत्येकाने विश्वास ठेवावा असे आम्हाला वाटते. ट्विटरचा युज आणि स्पॅमबाबत ट्विटरची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. आम्ही मशीन लर्निंग टूल्सच्या मदतीने विश्वासार्हता राखण्यासाठी व्यापकपणे स्पॅमशी लढा देत आहोत. यादरम्यान फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होऊ शकतात'', असे ट्विटरने म्हटले.
ट्विटरने पुढे म्हटले की, ''आम्ही हेरगिरी आणि स्पॅमवरील आमच्या धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे दर आठवड्याला लाखो खाती डिलीट करत आहोत. अधिक तपशीलांसाठी तुम्ही ट्विटरच्या नवीन ट्रांसपेरंसी सेंटर अपडेटवर एक नजर टाकू शकता. काही खात्यांमध्ये थोडाफार फरक असला तरी काही प्रकरणांमध्ये संख्या जास्त असू शकते'', असे ट्विटरने स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यासाठी ट्विटरचा "अनावश्यक सहभाग" आहे. सरकारी मोहिमेबाबत ट्विटरवर आवाज दाबला जात आहे. 27 डिसेंबरच्या पत्रात त्यांच्या ट्विटर खात्यावरील डेटाचे विश्लेषण तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी तुलना करण्यात केली. त्यात राहुल गांधी म्हणाले की, 2021 च्या पहिल्या सात महिन्यांत त्यांच्या खात्यात सरासरी 4 लाख फॉलोअर्स जोडले गेले. पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आठ दिवसांच्या स्थगितीनंतर ही वाढ अचानक अनेक महिने थांबली.
याच काळात इतर राजकारण्यांच्या फॉलोअर्सची संख्या अबाधित राहिली. मला काही लोकांकडून कळवण्यात आले आहे की ट्विटर इंडियावर माझा आवाज बंद करण्यासाठी सरकारचा प्रचंड दबाव आहे. माझे खाते काही दिवसांसाठी वैध कारणाशिवाय ब्लॉक करण्यात आले. सरकारसह ट्विटरवर ज्यांनी तत्सम छायाचित्रे ट्विट केली, त्यापैकी एकही अकाऊंट ब्लॉक करण्यात आले नव्हते. फक्त माझे खाते टार्गेट करण्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले होते.