नवी दिल्ली : भारत सरकार आणि ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच द्वेष पसरवणारे ट्विटर अकाऊंट्स बंद करण्याविषयी केंद्र सरकारकडून ट्विटरला नोटीस पाठवण्यात आली होती. ट्विटरने दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. यानंतर ट्विटरने केंद्र सरकारच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. (twitter response to indian government over action on farmers agitation hashtag)
केंद्र सरकारकडून सुचवण्यात आलेले ५०० हून अधिक अकाऊंट्स ब्लॉक केल्याचे ट्विटरने नोटिसीला उत्तर देताना सांगितले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी अॅक्ट कलम ६९ अ (३) नुसार पाठवलेल्या नोटिसीत ज्या ट्विटर हँडल्सचा उल्लेख केला आहे. त्या संबंधित अकाउंट्सची तपासणी करण्यात येईल, असे ट्विटरकडून सांगण्यात आले.
इंधन दरात पुन्हा वाढ; मुंबईतील पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर जाणून घ्या
स्थानिक कायद्याचा आदर करण्याचे ध्येय
मुक्त अभिव्यक्तीच्या आमच्या मूलभूत तत्त्वांचे रक्षण करत असताना स्थानिक कायद्यांचा आदर करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. ट्विटरवर चुकीच्या माहितीबद्दल आमच्याकडे कोणी तक्रार केली, तर यासंदर्भात ट्विटरचे नियम आणि स्थानिक कायदा यांची पडताळणी केली जाईल. मजकुराने ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केले गेले असेल, तर तो मजकूर काढून टाकला जाईल, अशी माहिती ट्विटरच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.
सूचनांचे पालन करणे बंधनकारक
सार्वजनिक द्वेष व तणावाचे वातावरण बिघडू नये, यासाठी या सूचनांचे पालन करणे ट्विटरला बंधनकारक आहे. ट्विटरवर 'प्रेरणा मोहीम' आणि पंतप्रधान मोदींबाबत हॅशटॅगचा वापर 'असभ्य भाषा, चिथावणी आणि तणाव निर्माण करण्यासाठी' केला जात आहे, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर यांनी ट्विटरच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले.
पाकिस्तानचा संबंध
सरकारने दिलेल्या निर्देशानंतर ट्विटरने जी ५०० हून अधिक अकाउंट्स बंद केली आहेत. त्यामध्ये १२६ अकाउंट्समधील मजकुरात #ModiPlanningFarmerGenocide तर, ५८३ अकाउंट्स हे खलिस्तानी आणि पाकिस्तानशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व अकाउंट्सद्वारे दिशाभूल करणारी माहिती आणि चिथावणीखोर मजकूर असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.