मुंबई: कर्नाटकमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपाकडून सुरू असलेल्या राजकारणावर टिप्पणी केल्यामुळे बॉलीवूड अभिनेता उदय चोप्राला ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. कर्नाटकमध्ये राज्यपाल वजुभाई वाला यांनी काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाला (जेडीएस) डावलून भाजपाला प्रथम सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले. काँग्रेस व भाजपामध्ये यावरून मोठा राजकीय वादही रंगला आहे. उदय चोप्रा याने भाजपाच्या या राजकारणाबद्दल ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती. मी अनेकदा मनातील खऱ्या भावना लपवण्यासाठी काहीबाही बोलत असतो. कर्नाटकमधील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहताना मजा येत आहे. मी गुगलवर कर्नाटकच्या राज्यपालांबद्दल माहिती शोधल्यानंतर ते भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याचे समजले. या माध्यमातून उदय चोप्राने कुठेतरी भाजपा व कर्नाटकच्या राज्यपालांचे संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.
हीच बाब त्याला चांगलीच महागात पडली. उदय चोप्राच्या या ट्विटनंतर ट्रोलर्सची फौज लगेचच त्याच्यावर तुटून पडली. अनेकांनी त्याला मूर्ख आणि पराभूत अशा शब्दांत हिणवायला सुरुवात केली. त्यावर उदयनेही ट्रोलर्सना प्रत्युतर दिले. लोकशाहीत पराभूतांनाही आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो, असे त्याने म्हटले. तसेच माझे या सगळ्याशी काही देणेघेणे नाही. मात्र, मी एक भारतीय असून मला माझ्या देशाची काळजी असल्याचेही उदयने म्हटले.