नवी दिल्ली : एका महिलेच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपात रविवारी आपच्या एका आमदाराला अटक करण्यात आली. अमानतुल्ला खान, असे या आमदाराचे नाव आहे. तर जूनमध्ये पंजाबमधील मालेरकोटला येथे झालेल्या धार्मिक ग्रंथाच्या अवमान प्रकरणात दिल्लीतील महरौलीचे आपचे आमदार नरेश यादव यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. आपचे अटक होणारे आतापर्यंतचे हे अकरावे आमदार आहेत. एका महिलेने अमानतुल्ला यांच्यावर असा आरोप केला होता की, वीज कनेक्शनच्या मुद्यावरून आपण या आमदारांच्या निवासस्थानी गेलो होतो. तेव्हा या आमदारांनी कथितरीत्या हत्येचा प्रयत्न केला. अमानतुल्ला खान यांना प्रथम येथे चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर अटक करण्यात आली. एक दिवसापूर्वीच खान यांनी असा आरोप केला होता की, पोलिसांच्या दबावातून ही महिला आपल्यावर आरोप करीत आहे. (लोकमत न्यूज नेटकवर्क)या महिलेने असा आरोप केला आहे की, वीज कनेक्शनबाबत आपण आमदार खान यांना भेटण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, या आमदारांच्या घरून परतत असताना एका वाहनाने आपल्याला चिरडण्याचा प्रयत्न केला.आमदार खान याच वाहनात बसलेले होते. यापूर्वी १९ जुलै रोजी या महिलेने पोलिसांत एक तक्रार दिली होती. या तक्रारीत महिला म्हणते, जामियानगर येथील आप आमदाराच्या निवासस्थानी १० जुलै रोजी एका युवकाने आपल्याशी छेडछाड केली होती आणि धमकी दिली होती की, जर या प्रकरणाचे राजकारण करणे बंद केले नाही, तर आपणास जिवे मारण्यात येईल. त्यानंतर या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला होता.
आम आदमी पार्टीच्या दोन आमदारांना अटक
By admin | Published: July 25, 2016 4:00 AM