जलपायगुडी (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील बालतस्करीप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यासह दोन जणांना अटक केली. संशयास्पद दत्तक विधानाद्वारे बालके आणि मुलांची विक्री केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, असे पोलिसांनी सांगितले. दार्जिलिंगचे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मृणाल घोष आणि जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य देबाशिष चंद्र यांना ताब्यात घेऊन सिलीगुडीतील पिनटेल गावात त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर लगेचच त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. जलपायगुडीत बालतस्करी प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढत चालली आहे. यापूर्वी भाजप महिला आघाडीच्या नेत्या जुही चौधरी आणि अन्य तीन जणांना अटक झाली आहे. त्यात चंदना नावाच्या महिलेचा समावेश असून, तिनेच जुही चौधरी व कैलाश विजयवर्गीय यांचे नाव सांगितले होते. विजयवर्गीय यांनी आरोप फेटाळला आहे. पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग हा तृणमूल काँग्रेसचा भाग बनला असून, राजकीय आकसानेच भाजपा नेत्यांवर कारवाई केली जात आहे, असे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)१७ बालकांची विक्रीबालगृहातील मुख्य दत्तक अधिकारी सोनाली मंडल आणि शिशुगृहाच्या प्रमुख चंदना चक्रवर्ती आणि त्यांचे भाऊ मानस भौमिक यांचा त्यात समावेश आहे. त्यांनी संशयास्पद दत्तक विधानाद्वारे १ ते १४ वर्षे वयोगटातील १७ बालकांची परदेशी नागरिकांना विक्री केल्याचा आरोप आहे. तथापि, सीआयडीने त्यांच्यावर कोणत्या कलमांखाली आरोप लावले हे स्पष्ट होऊ शकले नाही. सीबीआयने गेल्या नोव्हेंबरमध्ये दक्षिण बंगालच्या काही भागांसह, कोलकात्यातील बेहाला आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील शिशुगृहांवर धाडी टाकून बालतस्करी रॅकेट उघडकीस आणले होते.
बालसंरक्षण अधिकाऱ्यासह दोन अटकेत
By admin | Published: March 05, 2017 1:18 AM