ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - राजधानी दिल्लीमधील इंदिया गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. दोन विमानं समोरासमोर आल्याने टक्कर होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (एटीसी) वेळीच संपर्क साधल्याने अपघात होता होता टळला. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडिया आणि इंडिगोचं विमान एकाच रनवेवर आलं होतं. यामुळे दोन्ही विमानांमध्ये टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने प्रसंगावधान दाखवत वेळीच दोन्ही विमानांशी संपर्क साधल्याने मोठा अपघात टळला. सध्या याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आला असून नेमकी चूक कोणाची होती याचा तपास केला जात आहे.
याआधीदेखील गतवर्षी 27 डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावर अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी इंडिगो आणि स्पाईसजेटच्या विमानांची टक्कर होऊन अपघात होणार होता. याशिवाय अशा प्रकारच्या अनेक घटना दिल्ली विमानतळावर घडल्या असून विमानतळ व्यवस्थापन यावर अंकूश ठेवण्यात असमर्थ ठरला आहे.