नवी दिल्ली : स्थानिक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआयए) बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर गुरुवारी उड्डाणाच्या तयारीत असलेली नेपाळ आणि भुवनेश्वरला जाणारी दोन विमाने थांबविण्यात आली होती. अखेर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.सकाळी १० वाजता विमानतळाच्या नियंत्रण कक्षाला फोन येताच सुरक्षा संस्थांनी रॉयल नेपाळ एअरलाईन्स (दिल्ली-काठमांडू) आणि एअर इंडियाच्या ( दिल्ली- भुवनेश्वर) विमानातील प्रवाशांना बाहेर काढून तपासणी केली. बॉम्ब धोका आढावा समितीने (बीटीएसी) दोन्ही विमानातील प्रवाशांच्या बॅगांची दुसऱ्यांदा तपासणी केली. सुरक्षा संस्थांनी फोन नेमका कोणत्या क्रमांकावरून आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. एअर इंडियाच्या विमानाने चार खासदार प्रवास करीत होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान गेल्या वर्षी विविध विमानतळांवर अफवांचे ४४ कॉल आल्याची नोंद आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बॉम्बच्या अफवेमुळे दोन विमानांचा दिल्लीत खोळंबा
By admin | Published: March 18, 2016 1:59 AM