अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाने जागेच्या मालकीविषयीचा निकाल देण्याआधीच दिवाळीनिमित्त शनिवारी अयोध्या ५ लाख ५१ हजार दिव्यांच्या रोषणाईने झगमगून उठले. तेथील शरयू नदीच्या किनाऱ्यापासून प्रत्येक मंदिर, मठ, तसेच घरे, कार्यालये व दुकानांवर पणत्या व दिवे लावण्यात आले. त्यामुळे दीपोत्सवासाठी अयोध्या व शेजारील फैजाबाद शहर दिव्यांनी रंगून गेले.
तेथे ५ लाख ५१ हजार पणत्या व दिवे लावण्यात येणार असल्याचे कळताच गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे पथकही तेथे पोहोचले आहे. शरयू नदीचा किनारा खरे तर शुक्रवारी रात्रीच पणत्यांनी लखलखला होता. मंदिरे व मठांवर कालपासूनच पणत्या लावायला सुरुवात झाली होती. मठ व मंदिरांत व बाहेर दीड लाख पणत्या लावण्याची जबाबदारी साकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वत:कडे घेतली आहे.दीपोत्सवासाठी अयोध्या व फैजाबाद परिसरात तसेच शरयू नदीच्या तीरावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच धडक कृती दल, प्रांतिक सशस्त्र दलाचे जवान तिथे होते. त्याशिवाय गुप्तचर विभागही अतिशय सतर्क आहे. दीपोत्सवासाठी अयोध्येत येणाऱ्यांच्या मार्गांत अडथळा येऊ नये, यासाठी जड वाहनांना तेथे बंदी घालण्यात आली होती. लोकांना खरेदी करता यावी, यासाठी रात्री उशिरापर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. दीपोत्सवानिमित्त तेथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुद्दाम संध्याकाळी तेथे आले.रामकथा पार्कमध्ये राम, लक्ष्मण व सीतेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे स्वागत करण्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळीच झाली. राम, सीता व लक्ष्मण यांची अयोध्येतून शोभायात्रा काढण्यात आली. रात्री शरयूच्या तीरावर आतषबाजीही करण्यात आली.