ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.17- राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाच्या शेवटच्या महिन्यामध्ये प्रणव मुखर्जी यांनी दयेचे दोन अर्ज फेटाळले आहेत. यामुळे त्यांच्या कार्यकाळामध्ये फेटाळण्यात आलेल्या दयेच्या अर्जांची संख्या 30 इतकी झाली आहे. हे दोन अर्ज मे महिन्याच्या अंतिम आठवड्यात फेटाळले गेले. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार फेटाळण्यात आलेले अर्ज 2012 मधील इंदूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवरील तिघांनी केलेला बलात्कार आणि 2007 मध्ये पुण्यात टॅक्सीचालक व त्याच्या मित्राने केलेल्या बलात्काराच्या प्रकरणासंबंधी आहेत.
केतन उर्फ बाबू, जितू उर्फ जितेंद्र आणि देवेंद्र उर्फ सनी हे तिघे इंदोरमधील बलात्कार प्रकरणामध्ये दोषी आढळले होते. पुण्यातील खटल्यामध्ये पुरुषोत्तम दशरथ बोराटे आणि प्रदीप यशवंत कोकाडे यांच्यावर दोषारोप सिद्ध झाला होता. जानेवारी महिन्यामध्ये राष्ट्रपती मुखर्जी यांनी कृष्णा कोहली, नन्हेलाल मोची, बीर कुएर पासवान आणि धर्मेंद्र सिंग उर्फ धारु सिंग यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले होते. त्यानंतर काही महिन्यांमध्येच आलेले हे दयेचे दोन अर्ज त्यांनी फेटाळले आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळलेल्या अर्जांमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाब, 2001 साली संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरु तसेच चंदनतस्कर वीरप्पनचे साथीदार सायमन, घनप्रकाश, मदय्या आणि बिलवंद्रन यांचा समावेश आहे.
प्रणव मुखर्जी यांच्याआधी राष्ट्रपती असणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांनी दयेच्या 34 अर्जांना मान्यता दिली होती तर तीन अर्ज फेटाळले होते. त्यापुर्वी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केवळ एक दयेचा अर्ज फेटाळला होता तर एका अर्जासाठी क्षमादान दिले होते. धनंजय चक्रवर्तीने केलेल्या बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्याबाबत केलेला दयेचा अर्ज कलाम यांनी फेटाळला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 14 जुलै रोजी संपत असून नव्या राष्ट्रपतींसाठी 17 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 28 जून असून 1 जुलैपर्यंत अर्ज मागे घेण्यास अवधी असेल. सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांनी आतापर्यंत कोणाचेही नाव उमेदवारीसाठी जाहीर केलेले नाही.