सुंजवां : जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात २ अधिकारी (जेसीओ) शहीद झाले असून, १ मेजर व १ सुरक्षा जवानाची मुलगी व ५ महिला यांच्यासह ९ जण जखमी झाले. मेजरची प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला ४ ते ५ अतिरेक्यांनी केला. त्यापैकी ३ जणांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. आणखी ३ अतिरेकी कॅम्पमधील निवासी भागात लपून बसले असून, त्यांचा शोध सुरू आहे.या अतिरेकी हल्ल्यात सुभेदार मदनलाल चौधरी व सुभेदार मोहम्मद अशरफ मीर शहीद झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.पहाटे ५च्या सुमारात काही अतिरेकी गोळीबार करीत कॅम्पमध्ये शिरले आणि तेथील अधिकाºयांच्या निवासी भागात घुसले. आत शिरताना त्यांनी जवानांवर गोळीबार केला. अतिरेकी निवासी भागात घुसल्याने जवानांनी या भागाला घेरले. निवासी भागातून लोकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात एक अधिकारी शहीद झाला आणि ५ महिला आणि एका मुलीसह ९ जण जखमी झाले. जखमींमध्ये हवालदार अब्दुल हमीद, लान्स नायक बहादूर सिंह आणि दिवंगत सुभेदार चौधरी यांच्या मुलीचा समावेश आहे.कमांडो पथकातर्फे आॅपरेशन सुरू आहे. जम्मूत हाय अॅलर्ट घोषित केला आहे. संसद हल्ल्यातील अफजल गुरुला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी फाशी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ९ तारखेच्या दरम्यान जैश-ए-मोहम्मदकडून हल्ले होण्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला होता.हेलिकॉप्टर, ड्रोनची मदतअतिरेक्यांची माहिती घेण्यासाठी हेलिकॉप्टर व ड्रोनची मदत घेतली जात आहे. या भागात निमलष्करी दल, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. अतिरेकी ४ ते ५ अतिरेकी असावेत, असा अंदाज आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आसपासच्या शाळा बंद केल्या आहेत.पोलीस महानिरीक्षक एस. डी. सिंह जामवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, पहाटे ४.५५ च्या सुमारास जवानांनी संशयित हालचाली पाहिल्या. संशयितांनी गोळीबारही केला. जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर, या अतिरेक्यांना घेरण्यात आले. सैन्याचे स्पेशन आॅपरेशन ग्रुपचे जवान घटनास्थळी हजर झाले आहेत. रात्रीपर्यंत दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू होता.केंद्राला दिली माहितीलष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सकाळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना या हल्ल्याची व तिथे सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. सीतारामन यांनीनंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. गृहमंत्र्यांनी काश्मीरच्या पोलीस महासंचालकांकडूनही हल्ल्याची व राज्यात अन्यत्र करण्यात आलेल्या बंदोबस्ताची माहिती दिली. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मोहीम अद्याप सुरू आहे. ती पूर्ण होत नाही, तोवर बोलणे उचित नाही. आपले लष्कर भारतीयांची मान कधीही झुकू देणार नाही....तर युद्धच पुकारावे लागेलपाकिस्तानातून दहशतवादी आले नाहीत आणि अशा घटना घडल्या नाहीत, असा एकही दिवस जात नाही. भारताशी चांगले संबंध हवे असतील, तर पाकिस्तानला दहशतवाद थांबवावा लागेल, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील. खेदाने मी असेही म्हणेन की, पाकिस्तानने असेच वागणे सुरू ठेवले, तर भारताला त्याच्याविरुद्ध युद्ध पुकारावे लागेल.-डॉ. फारुख अब्दुल्ला,अध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स
लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्यात २ अधिकारी शहीद; ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 5:50 AM