ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 493 हिऱ्यांसह दोन जणांना अटक केली. ही कारवाई गेल्या आठवड्यात करण्यात आली.
गेल्या आठवड्यात विमानतळाच्या ग्रीन कॉरिडॉरमध्ये आलेल्या दोन व्यक्तींच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यातील एक व्यक्ती पॉवर बँक लपवत असल्याचे पोलिसांच्या नजरेत आले. त्यानंतर पोलिसांनी या पॉवर बँकची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 493 पैलू न पाडलेले हिरे आढळून आले. हे हिरे कांगो येथून आणण्यात आले होते.
अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्तींपैकी एक जण हा सूरत येथील जवाहीर आहे. तर दुसरा गेल्या 15 वर्षांपासून आफ्रिकेत राहत असलेला सराईत तस्कर आहे. पोलीस अधिकारी करण थापर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सीमाशुल्क विभागाने त्यांच्याकडून 493 हिरे जप्त केले. दरम्यान, या हिऱ्यांचे एकूण मूल्य निश्चित झालेले नाही. मात्र भारतीय सीमाशुल्क विभागाच्या इतिहासात जप्त करण्यात आलेला हा सर्वाधिक किमतीचा ऐवज ठरण्याची शक्यता अधिकारी वर्तवत आहेत.