कोहिमा : नागा बंडखोरांनी रविवारी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या चार जवानांना वीरमरण आले असून, ६ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड (खापलांग) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला.नागालँडमध्ये बराच काळ या संघटनेचे लोक व सरकार यांच्यात वाद सुरू आहेत. सरकारने नागा बंडखोरांशी चर्चा बंद केली असून, नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड (खापलांग) संघटनेवर सरकारने बंदी घातली आहेत. या संघटनेचे काही बंडखोर अनेकदा म्यानमारमध्ये लपून बसतात आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करीत असतात.या नागा दहशतवाद्यांनी काल सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर हल्ला केला. आसाम रायफल्सचे जवान पाणी आणण्यासाठी नदीजवळ गेले होते. ते नदीपाशी पोहाचेताच दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि आणि ग्रेनड हल्लाही केला. तिथे जवळपास तासभर गोळीबार व बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत होते अशी माहिती स्थानिकांनी दिली. जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ३० किमी दूर असलेल्या मोन जिल्ह्यातील अंबोई नगर येथील वस्तीजवळ ही घटना घडली. येथील स्थानिक लोकांनी सांगितले की, बंडखोर आणि जवान यांच्यात चकमक सुरु असताना गोळीबार आणि बॉम्बचा जवळपास एक तास मोठा आवाज येत होता.
नागा बंडखोरांच्या घातपाती हल्ल्यात दोन जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 7:49 AM