नवी दिल्ली : मिमी चक्रवर्ती व नुसरत जहां ही नावे पश्चिम बंगालखेरीज अन्य राज्यांतील लोकांना कदाचित माहीतही नसतील. त्या दोघी बंगाली चित्रपट अभिनेत्री म्हणून तेथील लोकांना माहीत आहेत. पण आता त्यांना वेगळी ओळख मिळाली आहे.त्या दोघी तृणमूल काँग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून आल्या आहेत. मिमी चक्रवर्ती या जादवपूर मतदारसंघातून, तर नुसरत जहां या बशीरहाट मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसविरुद्ध प्रचाराची राळ उठवली होती. पण मिमी चक्रवर्ती व नुसरत जहां या भाजप उमेदवारापेक्षा अडीच ते पावणेतीन लाख अधिक मते मिळवून विजयी झाल्या. मिमी यांचे वय आहे ३0, तर नुसरत जहां २९ वर्षांच्या आहेत.निवडून आल्यानंतर त्या दोघी सोमवारी प्रथमच संसद भवनात गेल्या. त्यांनी तेथून आपली ओळखपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर बाहेर आल्यावर दोघींनी ओळखपत्रांसह आपली छायाचित्रे काढून घेतली. ती छायाचित्रे लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाली. खरेतर त्यांनीच ती इन्स्टाग्रामवर पोस्ट केली.ती पाहून आनंद व्यक्त करण्याऐवजी लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोडच उठवली. तुम्ही संसदेबाहेर उभ्या आहात, हे लक्षात ठेवा. तिथे काही फोटोशूट सुरूनाही. संसद हे कायदे बनवणाऱ्यांचे सभागृह आहे. त्याचा मान ठेवा, अशा असंख्य पोस्ट सोशल मीडियावर पडू लागल्या आहेत. वास्तविक अनेक नेत्यांची संसदेबाहेरील अशी छायाचित्रे यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. पण त्यांच्यावर कोणीही टीका केली नव्हती. केवळ अभिनेत्री असल्यानेच ही बोलणी आपल्याला खावी लागत आहेत, हे या दोघा अभिनेत्रींच्या नंतर लक्षात आले.>२0 चित्रपटांत अभिनयमिमी चक्रवर्ती व नुसरत जहां या दोघींनी आतापर्यंत सुमारे २0 बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुसरत जहां यांनी काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.दोघींनाही उत्कृष्ट अभिनयासाठी काही पुरस्कारही मिळाले आहेत. नुसरत जहां यांनी ‘मिस कोलकाता’ स्पर्धेमध्येही पारितोषिक पटकावले आहे.>१३ महिला एका राज्यातूनतृणमूल काँग्रेसचे यंदा २२उमेदवार लोकसभेवर निवडून गेले. त्यापैकी ११ महिला आहेत, हे विशेष. प. बंगालमधून विजयी झालेल्या भाजपच्या १८ उमेदवारांतही दोन महिला आहेत. म्हणजे देशातून ज्या ७८ महिला यंदा विजयी झाल्या, त्यापैकी १३ जणी प. बंगालमधील आहेत.
दोघा बंगाली अभिनेत्रींना मिळाली वेगळी ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 4:30 AM