भोपाळ : कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल आघाडीचे कुमारस्वामी सरकार पाडल्यानंतर २४ तासांच्या आतच भाजपच्या मध्य प्रदेशातील नेत्यांनी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पाडण्याची भाषा सुरू करताच, तसे करूनच दाखवा, असे प्रतिआव्हान कमलनाथ यांनी बुधवारी दिले. एवढेच नव्हे, तर विधानसभेत एका सरकारी विधेयकावर भाजपच्या दोन आमदारांनी सरकारच्या म्हणजेच काँग्रेसच्या बाजूने मतदान करून, भाजपलाच जोरदार दणका दिला.
आम्हाला नंबर १ व २ च्या नेत्यांकडून आदेश मिळाल्यास कमलनाथ सरकार आम्ही २४ तासांत पाडू, असा इशारा भाजपचे मध्य प्रदेशातील नेते गोपाल भार्गव यांनी दिला होता. त्यानंतर काही तासांतच भाजपच्या दोन आमदारांनी आपण भाजप नव्हे, तर काँग्रेसबरोबर आहोत, असे दाखवून दिले. त्यानंतर कमलनाथ यांनीही आपले सरकार पाडून दाखवाच, असे उघड आव्हान भाजपला दिले.
गोपाल भार्गव हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी सरकार पाडण्याची भाषा केल्यानंतर लगेचच दोन आमदार फुटल्याने भाजप नेतेही गोंधळून गेले आहेत. नारायण त्रिपाठी व शरद कौल अशी या आमदारांची नावे असून, त्यांनी आम्हाला भाजपमध्ये चांगली वागणूक मिळत नसल्याचीही तक्रार केली. नारायण त्रिपाठी यांनी तर ही आपली घरवापसी असल्याचे उघडपणेच सांगितले.
हे दोघे पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर ते भाजपमध्ये गेले होते. मतदानानंतर कमलनाथ म्हणाले की, आमचे सरकार अल्पमतात आहे, असे भाजप नेते सतत सांगत असतात. पण भाजपकडे बहुमत असते, तर आज विधानसभेत मतदानाद्वारे त्यांना ते सिद्ध करता आले असते. पण भाजप नेत्यांचे दावे बोगस आणि खोटे आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसचे ११४ व भाजपचे १0९ आमदार आहेत. कमलनाथ सरकारला बसप, सप तसेच अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. शिवाय आणखी दोन भाजप आमदार आता काँग्रेसकडे आले आहेत. लोकसभा निवडणुकीत २९ पैकी २८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर काँग्रेसला अवघ्या एकाच जागेवर विजय मिळवता आला. त्यामुळे भाजप नेते काँग्रेसला सत्तेबाहेर करण्याचे प्रयत्नात आहेत, असे समजते.
आम्ही पूर्ण बहुमतात आहोत हे सिद्ध झाले आहे. शिवाय भाजपच्या दोन आमदारांनीही आज आमच्या बाजूने मतदान केले आहे. सरकार पाडण्यासाठी आमचे आमदार फोडून दाखवाच. पण भाजप नेत्यांचे सारे दावे बोगस आणि खोटे आहेत. - कमलनाथ, मुख्यमंत्री