कोलकाता/कल्याणी : पश्चिम बंगालमधील कल्याणी शहराजवळच्या हंसखाली भागातील छोटो चुत्रिया गावात खोदकाम करताना पाचशे पौंड वजनाचे दोन बॉम्ब सापडले. ते आहेत दुसºया महायुद्धाच्या काळातील. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कल्याणी शहर १९४५ सालापर्यंत रुझवेल्ट नगर नावाने ओळखले जायचे. रुझवेल्ट नगरामध्ये अमेरिकी फौजांनी काही ठिकाणी शस्त्रागारे स्थापन केली होती. हे दोन बॉम्ब त्याच शस्त्रसाठ्यापैकी असावेत.खोदकाम करताना मजुरांना ५० इंच लांब व ३८ इंच रुंदीचे दोन सिलेंडर आढळले. साफसफाईनंतर कळले की हे बॉम्ब आहेत. संरक्षण दलातील अधिकाºयाने सांगितले की, ४५ गावांचे मिळून बनलेल्या रुझवेल्ट नगरमध्ये दुसºया महायुद्धाच्या काळात अमेरिकी लष्कराचा तळ होता.चीन, बर्मा (आताचा म्यानमार), भारत या क्षेत्रातील कारवायांसाठी इथूनच अमेरिकी लष्करी सूत्रे हलविली जायची. जपानच्या विरोधात लढण्यासाठी चीनला मदतीचा निर्णय त्यावेळी अमेरिकेने घेतला होता. कारवाईनंतर अमेरिकेचे लष्कर भारतातून निघून गेले. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांनी १९५०च्या दशकाच्या प्रारंभी कल्याणीजवळ एक जुळे शहर वसवायचे ठरविले. अमेरिकी लष्कराने बांधलेल्या काही वास्तू किंवा त्यांचे अवशेष आजही कल्याणी परिसरात आढळून येतात.होत असे बॉम्बची ने-आण : कल्याणी शहरापासून काही अंतरावरील कांचरापारा येथे पूर्वी रॉयल एअर फोर्सचा तळ होता. तिथून अमेरिकेच्या हवाई दलाकडे असलेल्या बी-२५ मिशेल जातीची विमानांचे उड्डाण होत असे. येथूनच ५०० टन वजनाच्या बॉम्बची नेआण केली जायची.
पश्चिम बंगालमध्ये सापडलेले दोन बॉम्ब दुसऱ्या महायुद्धातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:18 PM