नवी दिल्ली-
भारतीय लष्कराचा सार्थ अभिमान वाटावा अशी अनेक कार्य आजवर जवनांनी केली आहे. यातच आणखी एक मानाचा तुरा रोवत भारतीय लष्करातील जवानांनी वाखाणण्याजोगं काम केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील अमरनात यात्रेच्या मार्गावरील दोन पूल भूस्खलनामुळे वाहून गेले होते. भारतीय लष्कराच्या जवानांनी या यात्रेचं महत्व लक्षात विक्रमी वेळेत दोन्ही पूल पुन्हा बसवले आणि सर्वांची वाहवा मिळवली आहे.
बालटाल मार्गावर पूल वाहून गेल्यानं अमरनाथ यात्रेच्या मार्गात विघ्न निर्माण झालं होतं. भारतीय जवानांनी गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री अविरत काम करुन अमरनाथ यात्रेचा मार्ग सुरक्षित केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार तापमानात अचानक वाढ झाल्यानं बालटाल मार्गावरील कालीमाता मंदिराजवळ पूर आला होता. या पुरात दोन पूल वाहून गेले. त्यामुळे यात्रेकरूंची मोठी गैरसोय झाली होती. प्रशासनानं लष्कराच्या चिनार कोर विभागाला हे पूल उभारण्याची विनंती केली. त्यानंतर जवानांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत विक्रमी वेळेत दोन्ही पूल पूर्ववत केले.
हेलिकॉप्टर आणि खेचरांसह स्वत: जवानांनी आवश्यक सामान वाहून नेलं आणि पूल बांधले. भारतीय लष्कराच्या इंजिनिअर रेजिमेंटनं खराब हवामान आणि रात्रीच्या अंधाराचा सामना करत दोन्ही पूल पुन्हा सुरू केले. अमरनाथ यात्रा यामुळे पूर्ववत झाली असून सर्व भाविकांनी भारतीय जवानांना सॅल्यूट करत त्यांचे आभार मानले.
अमरनाथ यात्रा ३० जून रोजी सुरू झाली असून पहिल्या तुकडीमध्ये २७५० यात्रेकरुंचा समावेश आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत यात्रेकरुंचा पहिला जथ्ता रवाना झाला आहे.