श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान कॅम्पमधून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दोन जवान बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. या दोन्ही जवानांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. मात्र, अद्याप यासंबंधी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफचे हे दोन्ही जवान जनरल ड्यूटी श्रेणींतर्गत सुंदरबनी उपजिल्हा मुख्यालय बीएसएफ कॅम्पमध्ये तैनात होते. सायंकाळी उशिरापर्यंत हे दोन्ही जवान कॅम्पमधून परत आले नाहीत, त्यामुळे कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली. सुरुवातीला बीएसएफ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून इतर जवानांनी त्यांचा शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, दोघेही सापडले नाहीत. त्यानंतर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही जवानांचा शोध सुरू केला आहे. तसेच, उपजिल्हा मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या त्याच्या अन्य सहकाऱ्यांकडूनही चौकशी केली जात आहे. सध्या दोन्ही जवानांविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही.