नवी दिल्ली- ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रेटर नोएडामध्ये निर्माणाधीन असलेली सहा मजली इमारत आणि दुसरी एक इमारती कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ग्रेटर नोएडाच्या शाह बेरी व्हिलेज परिसरात या घटना घडल्या आहेत. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
पोलीस आणि एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीनं पोलीस आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्य राबवत आहेत. चार मजल्यांच्या इमारतीमध्ये अनेक कुटुंब राहत होती. तर निर्माणाधीन सहा मजल्यांच्या इमारतीत फक्त मजूर राहत होते. दोन्ही इमारतीतले मिळून जवळपास 50 जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगा-याखालून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्री महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.
या घटना मंगळवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडल्या असून, एक सहा मजली निर्माणाधीन आणि एक चार मजली इमारती कोसळल्या आहेत. चार मजल्यांच्या इमारतीमध्ये जवळपास 10 कुटुंबे वास्तव्याला होती. चार मजली इमारती ही जीर्ण झाली होती. तर दुस-या सहा मजल्यांच्या इमारतीचं बांधकाम सुरू असल्याचं एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे.