नवी दिल्ली : हवाला प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई करत दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. हे दोन चिनी नागरिक दिल्लीत राहून एका चीन कंपनीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवत होते, अशी माहिती मिळाली आहे. या दोन चिनी नागरिकांविरोधात पोलिसात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला असून, 'ईडी'ची मोठी कारवाई मानली जात आहे.
चार्ली पेंग आणि कार्टर ली असे या दोन चिनी नागरिकांची नावे आहेत. एका चिनी कंपनीसाठी हवाला रॅकेट चालवत होते. यामुळे भारत सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला, असे सांगितले जात आहे. ईडीकडून या दोघांविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाचा तपास करीत होती. चार्ली पेंग हा केवळ हवाला प्रकरणात सामील नसून तिब्बती धर्मगुरू दलाई लामा यांची हेरगिरी करत होता, अशी माहितीही तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे.
चार्ली बनावट कंपन्यांच्या माध्यमातून भारतात हवाला नेटवर्क चालवत होता. चार्लीने एनसीआरमध्ये इनविन लॉजिस्टिक्स इंडिया नावाने कंपनीची नोंदणी केली होती. पेंग आणि त्याच्या साथीदारांविरोधात १२ ऑगस्ट २०२० रोजी आयकर विभागाने कारवाई करत छापेमारी केली होती. डझनभर ठिकाणी छापेमारी केल्यानंतर आयकर विभागाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.