ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 13 - भारताचा जवळचा शेजारी बांगलादेशने चीनकडून 20.30 कोटी अमेरिकन डॉलर्सना दोन पाणबुडया विकत घेतल्या आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. बांगलादेशची सप्रभुता आणि अखंडतेसाठी या पाणबुडया विकत घेतल्या. त्यात काहीही चुकीचे नाही असे त्यांनी सांगितले. बांगलादेशच्या विकासामध्ये चीन महत्वाचा सहकारी असल्याचे हसीना म्हणाल्या.
बांगलादेश नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी या दोन पाणबुडया विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला. शेजारी देशांनी याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नये असे त्या म्हणाल्या. 035G मिंग क्लासच्या या पाणबुडया आहेत. बीएन नबाजत्रा आणि बीएन आग्राजत्रा अशी या पाणबुडयांना नावे देण्यात आली आहेत.
संसदेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली. चीनकडून 20.30 कोटी डॉलर्सना पाणबुडया विकत घेणे हे चीनबरोबरचे आर्थिक आणि संरक्षण संबंध दृढ होत असल्याचे लक्षण आहे असे विश्लेषकांनी सांगितले. 2013 मध्ये बांगलादेशने रशियाकडून युध्दसामग्री खरेदीचा करार केला त्याचवेळी शेख हसीना यांनी चीनकडून पाणबुडया विकत घेण्याची योजना जाहीर केली होती.
आणखी वाचा
सध्या सिक्कीम सीमेवरुन भारत आणि चीनमध्ये संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. त्यावेळी बांगलादेशसारखा जवळचा सहकारी चीनच्या जवळ जाणे भारताला परवडणारे नाही. चीनकडून सातत्याने युद्धखोरीची भाषा करुन भारताला धमक्या दिल्या जात आहेत. भारतानेही कणखर भूमिका घेत चीनच्या प्रत्येक आगळीकीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहे.
चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जवानांनी डोकलाम परिसरात तंबू ठोकल्यानंतर आता चीननेही येथे दीर्घकाळ उभे राहण्याच्या इराद्याने तळ ठोकला आहे. या ठिकाणी दोन्हीकडचे सुमारे प्रत्येकी ३०० सैनिक उपस्थित असून, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये केवळ १२० मीटरचे अंतर आहे. असे असले तरी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट होण्याची शक्यता नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नल दर्जाचे लष्करी अधिकारी दोन्हीकडच्या लष्करांचे नेतृत्व करत आहेत.