नवी दिल्ली - बेरोजगारीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं असतानाचा आता बचावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे सरसावले आहेत. भाजपा सरकारने केंद्रात सत्तेत येताना दरवर्षी 2 कोटी रोजगार उपलब्ध करु असं आश्वासन दिलं होतं त्यावरुन विरोधकांनी नोटाबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले असा आरोप केला. मग 2 कोटी रोजगारांचे झाले काय असा सवाल विरोधकांकडून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विचारला जाऊ लागला. त्यावर नितीन गडकरी यांनी एका हिंदी दैनिकाला मुलाखत देताना भाष्य केलं आहे.
नितीन गडकरी यांनी सांगितले की, दोन कोटी रोजगार तर फक्त त्यांच्या मंत्रालयाने दिले आहेत. माझ्या विभागाने १७ लाख कोटींची कामे दिली आहेत, ती भारत सरकाच्या बजेटपेक्षा अनेक पट जास्त आहे. दोन कोटी रोजगार तर फक्त माझे खातेच देत आहे. त्याचे आकडे आहेत. ई-रिक्षा पाहा. एक कोटी लोक हातरिक्षा चालवत होते, हा रोजगार नाही का? दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी सांगितले की, ई-रिक्षामुळे रोजगार मिळाल्याने राजधानीत गुन्हे घटले असंही गडकरींनी सांगितले.
तसेच गंगा स्वच्छतेवरुन विरोधकांवर टीका करताना गडकरी म्हणाले की, गंगा स्वच्छ झाली आहे. अलाहाबादहून कानपूर आणि हरिद्वारपर्यंत काही अडचणी आहेत. गेल्या कुंभाच्या वेळी घाण पाणी पाहून मॉरिशसचे पंतप्रधान स्नान न करताच गेले होते. या वेळी गंगा स्वच्छ होती, आम्ही ३०% कामच केले आहे. पुढील मार्चपर्यंत १००% करू. २६ हजार कोटींचे प्रकल्प आणत आहोत. पाणी स्वच्छ नसते तर प्रियंका गंगेचे पाणी प्यायल्या असत्या का? असा सवाल नितीन गडकरी यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान मोदींचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नावर उत्तर देताना गडकरी म्हणाले की, पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल. पक्षात लोकशाही व्यवस्था आहे. सध्या त्याची गरज नाही. कारण आम्हाला बहुमत मिळणार आहे. मात्र मी पुन्हा अध्यक्ष होणार नाही. मी एकदा अध्यक्ष झालो. काही दोष नसतानाही माझ्यावर आरोप झाले. चौकशीत निर्दोष सुटलो असं ते म्हणाले.
२०१४ मध्ये यूपीएबद्दल नाराजी होती. भाजपने जेव्हा नरेंद्र मोदींना एनडीएचा नेता निवडले तेव्हा लोकांच्या मनात आशा होती की हे स्थिती बदलतील. मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा वाढली असून काँग्रेसला माहीत आहे आपण सत्तेत येणार नाही त्यामुळेच न्याय सारख्या योजना आणण्याचं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात येतं आहे असा टोला नितीन गडकरी यांनी केला आहे.