नवी दिल्ली : केंद्र सरकारने आतापर्यंत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना २ कोटी २ लाख एन-९५ मास्क, १ कोटी १८ लाख पीपीई किट्स आणि ११ हजार ३00 व्हेंटिलेटर्स दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. राज्यांना देण्यात आलेले सर्व व्हेंटिलेटर्स पूर्णत: भारतात तयार झालेले आहेत.
कोरोनावर देशाच्या विविध भागांमध्ये उपचार सुरू असून, त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना अडथळे येऊ नयेत, म्हणून केंद्र सरकार या साहित्याचे वाटप करीत आहेत. याखेरीज रुग्णांसाठी १ लाख २ हजार आॅक्सिजन सिलिंडर्सही राज्यांना देण्यात येत असून, त्यापैकी ७२ हजार २९३ सिलिंडर्स राज्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. तसेच हायड्रोक्लोरोक्विनच्या ६ कोटींहून अधिक गोळ्या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.
देशातील आरोग्य यंत्रणा बळकट व सक्षम करण्यासाठी आम्ही सर्व ते उपाय योजत आहोत, असे आमचे प्रयत्न सुरू असल्याचेआरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सुरुवातीच्या काळात पुरविण्यात आलेली औषधे व साहित्य भारताने आयात केले होते. आतामात्र भारतात त्याचे वेगाने उत्पादन सुरू करण्यात आले असून, त्यात यशही येत आहे, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.