पाटणा - बिहारमधील बोधगया जिल्ह्यातील महाबोधी मंदिराजवळ बॉम्ब सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेसंदर्भात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, तिबेटी धर्मगुरू दलाई लामा सध्या बोधगयामध्येच असल्याने पोलिसांनी सुरक्षेमध्ये वाढ केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका स्फोटानंतर तपासणीदरम्यान परिसरात स्फोटकं स्थानिक पोलिसांनी आढळून आली. बिहार पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी एनएच खान यांनी याबाबत सांगितले की, दलाई लामा यांच्या व्याख्यानानंतर ते मोनेस्ट्रीमध्ये आराम करत होते तेव्हा कालचक्र मैदान परिसरात कमी तिव्रतेचा एक स्फोट झाला. या घटनेनं खळबळ माजल्यानंतर परिसरात तपासणी करण्यात आली आणि पोलिसांना दोन जिवंत बॉम्ब आढळून आले.
धक्कादायक म्हणजे दलाई लामा थांबलेल्या ठिकाणापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हे बॉम्ब सापडलेत आहेत. दरम्यान, 2013 साली महाबोधी मंदिराजवळ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाले होते. त्या घटनेनंतर महाबोधी मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा याच ठिकाणी बॉम्ब सापडल्यानं सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.